स्नेहल माणिक जगताप

विनम्र आवाहन!

प्रिय मतदार बंधू-भगिनींनो,
सप्रेम जय महाराष्ट्र!

आज या पत्रातून आपल्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. या आनंदासोबतच एक जबाबदारीची जाणीव मनामध्ये घट्ट रुजली आहे. महाड, माणगाव, पोलादपूर हे ऐतिहासिक वारसा असणारे तालुके आपल्या मतदारसंघाचा भाग आहेत. इथला ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा जपण्याची व बदलत्या जगाला साजेसा प्रगतीशील महाड विधानसभा मतदारसंघ घडवण्याची जबाबदारी मी अंगिकारली असून पायाभूत सुविधांसह आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या मानवी आयुष्याशी निगडित मुलभूत सोयीसुविधांमध्ये प्रभावी काम करण्याचे अभिवचन या निमित्ताने मी देते. माझे वडील माजी आमदार स्व. माणिकराव जगतापसाहेब आपल्या सर्वांचे लाडके आबा अचानकपणे आपल्याला सोडून गेले हा धक्का माझ्यासाठी, कुटुंबासाठी मोठा होताच; तेवढाच तो आबासाहेबांचे कार्यकर्ते व महाड पोलादपूर माणगावमधील आबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या जनतेसाठी हा मोठा होता. या काळात जनताजनार्दनाने, कार्यकर्त्यांनी कुटुंबाप्रमाणे माझ्या पाठीशी उभे रहात मला या प्रसंगाशी सामना करण्याचा धीर दिला. जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आबासाहेबांनी अंगिकारलेले समाजसेवेचे व्रत पुढे नेण्याची जबाबदारी मी स्विकारली आहे. स्व. माणिक जगतापसाहेबांनी राजकीय जीवनामध्ये सत्तापद असो किंवा नसो महाड विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास घेऊन तडफेने काम केले. त्यांच्या पश्चात त्यांचे अपूर्ण काम पुढे नेत मतदारसंघाला प्रगतीपथावर नेत सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचा संकल्प मी सोडला आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हा संकल्प सिध्दीस नेण्याचे बळ व प्रेरणा मला मिळेल याची मला खात्री आहे.

माझी राजकीय कारकीर्द महाड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदापासून सुरु झाली. नगरपालिका निवडणूक जाहिरनाम्यामध्ये दिलेल्या आश्वासनांपैकी किरकोळ अपवाद वगळता सर्व आश्वासने पूर्ण करण्यात मी यशस्वी झाली आहे. माझ्या नगराध्यक्ष पदाच्या काळामध्ये महाड नगरपालिकेची उभी राहिलेली छत्रपती श्री शिवाजी महाराज प्रशासकीय भवन ही भव्य वास्तू महाडच्या वैभवामध्ये आज मैलाचा दगड ठरली आहे. यासोबतच शहराचा नियोजनबध्द विकास करीत उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन, घनकचरा व्यवस्थापन व शहर स्वच्छ ठेवणे यावर मी अधिक भर दिला. आपल्या सर्वांच्या सहकार्याने त्यात यशस्वीही झाले. तब्बल तीन वेळा महाड नगरपरिषदेस राष्ट्रीय पातळीवर स्वच्छतेचे पुरस्कार प्राप्त झाले, हे त्याचेच फलीत.

२०२१ च्या महापुरामध्ये महाड शहरातील सार्वजनिक सुविधा जवळपास उध्वस्त झाल्या. त्याच काळात माझ्या वडिलांचे दुर्देवी निधन झाले पण कौटुंबिक दुःख बाजूला सारुन महाडला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देण्याच्या निर्धाराने मी वडिलांच्या निधनाच्या दुसऱ्या दिवशी जनसेवेसाठी मैदानात उतरले आणि तुमच्या आमच्या जिद्दीच्या जोरावर महाड शहर पुन्हा उभे करण्यात आपण यशस्वी ठरलो.

कोरोना काळामध्ये महाडमध्ये अपूर्ण वैद्यकीय सुविधा होत्या. महाड नगरपालिका व लोकविकास सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून महाड शहरामध्ये कोविड सेंटर सुरु केले. या कोविड सेंटरच्या माध्यमातून सुमारे एक हजार कोरोना रुग्णांना जीवनदान देण्याचे काम आमच्या हातून घडले, याबद्दल मी स्वतःला धन्य समजते. या कोविड सेंटरच्या उभारणीत स्व. माणिकराव जगताप यांचा सिंहाचा वाटा होता, हेही मी या ठिकाणी आवर्जून नमूद करते.

सन २०१९ मध्ये माणिकराव जगताप यांचा विधानसभा निवडणूकीमध्ये पराभव झाला. विरोधकांच्या हाती सत्ता गेली. नंतरच्या पंधरा वर्षाच्या काळात महाड विधानसभा मतदारसंघ विकासत्मकदृष्ट्या पिछाडीवर गेलेला आहे. स्व. माणिक जगताप आमदार असताना त्यांच्या काळामध्ये मंजूर झालेले धरण प्रकल्प, त्याचप्रमाणे इतर विकासकामे बासनात गुंडाळून ठेवण्यात आली आहेत. नव्याने विविध विकास कामांच्या घोषणा करण्यात आल्या, पण त्या केवळ घोषणाच ठरल्या आहेत. त्या घोषणांची पूर्तता झाल्याचे चित्र महाड विधानसभा मतदारसंघात कुठेही दिसत नाही. या घोषणा वाऱ्यावरच्या वराती ठरल्या आहेत. दादली पूल, गांधारी पूल, महाड शेवते वेल्हे रस्ता, दासगाव ते खाडीपट्टा विभागाला जोडणाका पूल, काळ जलविद्युत प्रकल्प, मतदारसंघातील विविध धरण प्रकल्प रखडले आहेत. याखेरीज मतदारसंघातील अनेक गावांमध्ये असंख्य जलजीवन योजना आजही अस्तित्वात नाहीत किंवा अपूर्णावस्थेत आहेत. मुबलक पाऊस पडूनही हा मतदारसंघ पाणीटंचाईला सामोरा जातोय हे खऱ्या अर्थाने गेल्या पंधरा वर्षातील मोठे अपयश आहे.

महाड येथे पूर्ण क्षमतेच्या आरटीओ कँम्पसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी गेली दहा वर्षे चालढकल सुरु आहे. गतिमान सरकार म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेणारे सरकार काम करत नसल्याचे विदारक चित्र आपल्याला पहावे लागत आहे. महाड विधानसभा क्षेत्रात दोन औद्योगिक वसाहती आहेत. स्व. माणिकराव जगताप यांनी आपल्या हयातीमध्ये कामगारांच्या हितासाठी शासनाला अनेक निर्णय घ्यायला लावले. वेळप्रसंगी स्वपक्षाशी वैचारिक संघर्ष करुन कामगारांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले. किमान वेतन कायदा हे त्याच उत्तम उदाहरण. मात्र आज या दोन्ही औद्योगिक वसाहतीमध्ये कारखानदार आणि कामगार वर्गांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजकीय दबावामुळे कारखानदार आपले कारखाने अन्यत्र स्थलांतरित करत आहेत. राजकीय आकसामुळे कामगारंना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. विविध समाज घटकांमध्ये वाद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हे भीषण वास्तव बदलून महाड मतदारसंघ प्रगतीपथावर नेण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे.

विधानसभा निवडणूक हे चित्र बदलण्यासाठी नामी संधी आपल्याला देणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे महाड विधानसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून मला संधी मिळाली आहे. राज्यभरात पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मोठी सहानुभूती निर्माण झाली आहे. पक्षप्रमुख उद्धवसाहेब महाराष्ट्र राज्याच्या अस्मितेची लढाई या निवडणूकीच्या निमित्ताने लढत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र घडविणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित केलेल्या संविधानाला अनुसरुन कायद्याचे राज्य असणारा महाराष्ट्र घ़डविणे, देशात आपल्या राज्याला पुन्हा क्रमांक एकवर नेण्यासाठी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी या मतदारसंघातील बलाढ्य प्रस्थापितांना बाजूला करण्यासाठी मला आपले आशीर्वाद हवे आहेत. आपली मोलाची साथ हवी आहे. त्यासाठी हा पत्ररुपी संवाद. महाड विधानसभा मतदारसंघाने गेली पंधरा वर्षे खुप काही सहन केले आहे आता या मतदारसंघाला गरज आहे बदलाची. तुमच्या साथीने हा बदल घडवून आणण्याची संधी मी आपणाकडे मागत आहे.

महाड विधानसभा मतदारसंघ अन्याय, अत्याचार, दहशतीच्या जोखडातून मुक्त करुन मतदारसंघात आश्वासक असे ‘स्नेहलपर्व' निर्माण करण्यासाठी मी मैदानात उरलेली आहे ते आपल्या सदिच्छा आणि आशीर्वादाच्या बळावरच!

उतणार नाही, मातणार नाही. स्व. बॅ. ए. आर. अंतलेसाहेब, स्व. दादासाहेब सावंत, स्व. अशोकदादा साबळे, स्व. चंद्रकांत देशमुख, स्व. शांतारामभाऊ फिलसे, स्व. अण्णासाहेब सावंत, स्व, प्रभाकर मोरे, स्व. माणिकराव जगताप यांच्या विचाराची वारस म्हणून संपूर्ण मतदारसंघाला अभिमान वाटेल असे काम माझ्या हातून होईल. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरदार गोदाजी जगताप यांची वंशज आणि महाड मतदारसंघाच्या सर्वांगिणी विकासासाठी जीवाचे रान करणाऱ्या स्व. माणिकराव जगताप यांच्या लेकीचा हा शब्द आहे.

धन्यवाद!

आपली स्नेहांकीत,
स्नेहल माणिक जगताप

मशाल पेटवू या,
महाडमधून स्नेहलदिदीला जिंकवू या!